परिचय

देशाची संपन्नता ही त्या देशाच्या उत्पादनशीलतेवर, निर्यातीवर मोजली जाते. परंतु देशातील
समाजाच्या उन्नतीचे मोजमाप मात्र समाजाच्या सुसंस्कृतपणा व सृजनशीलता याच गोष्टींवर केले
जाते. वाचनाने समाजाची सर्वांगीण उन्नती होऊन सुसंस्कृतता व सृजनशीलता वाढीस लागतात ही
गोष्ट 1898 साली आमच्या संस्थापकांनी पूर्णपणे हेरली व एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या
दशकात उगवलेल्या शिक्षणाच्या लाटेचा फायदा घेऊन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना
1ऑगस्ट 1898 रोजी नारळीपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर केली. उत्तरो्त्तर विकसीत होऊन आज ही
संस्था मानमान्यता पावून सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग उचलू
शकली. हे संस्थेस भुषणावह आहे. आजच्या संस्थेच्या ह्या विकासाचे सारे श्रेय आपल्या
संस्थापकांच्या नावे अनुक्रमे कै. मुकुंद बाळकृष्ण गुर्जर, बी.ए., कै. नरहर महादेव जोशी, कै. श्रीधर
बाळाजी मोडक, कै. अनंत नीळकंठ पिठकर, कै. विनायक बळवंत जोशी, कै. नारायण कृष्णा गद्रे, कै.
शंकर हरी शेजवलकर, कै. नारायण महादेव बाक्रे, कै. विठ्ठल वासुदेव टिल्लू, कै. गणेश लक्ष्मण पागे,
कै. अंबादास गोपाल पुणतांबेकर दूरदृष्टीस जाते. त्यानंतरच्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे व उत्तम
कार्यामुळे आजचे हे संस्थेचे विकसीत स्वरूप आपल्यापुढे आहे. संस्थेच्या वाटचालीची एकशे बाराहून
अधिक वर्षे पुरी होऊन ती त्याच जोमाने कार्यरत आहे.
आजपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याने व सेवकांच्या सेवाभावी वृत्तीने महाराष्ट्र
सारस्वताचे हे रोपटे बहरून आज समाजात चोखपणे आपली भूमिका पार पाडीत आहे. यात शंका नाही.
संस्थेच्या नायगाव, दादर येथील मध्यवर्ती ग्रंथालय व कार्यालयाच्या वास्तुचे उद्‌घाटन
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दि. 10 मार्च 1959 रोजी संपन्न
झाले.
आज मुंबईभर ह्या संस्थेच्या ३१ शाखा-विभाग कार्यरत आहेत. इतिहास संशोधन मंडळ, मराठी
संशोधन मंडळ ह्या दोन संलग्न संस्था संशोधनपर कार्य करून तिमाही संशोधन पत्रिका प्रसिद्ध
करीत आहेत. शं. ग. दाते सूचीमंडळ, ग्रंथसूची तसेच नियतकालिकांतील विविध विषयांची लेखसूची
करण्याचे जे कार्य करीत आहे ते एक प्रकारे अतुलनीय आहे. सानेगुरुजी बालविकास मंदिर ही संस्थेची
संलग्न शाखा बालक विकासाचे काम करीत आहे. महाराष्ट्र प्रबोधन शाखेतर्फे विविध शैक्षणिक
प्रबोधनपर कार्यक्रम आयोजले जातात. शारदोपासनेचे हे कार्य अखंडपणे गाजावाजा न करता शांतपणे
आज एकशे बारा वर्षे चालू आहे. ह्यातच संस्थेचे यश सामावले आहे.
संस्थेचे संदर्भालय हे संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण गणले जाते. दोन लाखांवर ग्रंथसंपदा, दैनिके
व साप्ताहिकांची लेखसूची, मासिकांतील लेखसूची, संदर्भमंजूषा तसेच दुर्मिळ 12000 ग्रंथ, 889
दोलामुद्रिते ह्यांनी हा संदर्भविभाग समृद्ध आहे. प्रशस्त हवेशीर दालने, उत्तम हवा खेळण्यासाठी
12 फूट उंची ही आज होणे कठीण. सरस्वतीचा कृपाहस्त असलेले संदर्भालय अनेक विद्वानांना अगदी
आपले स्वतःचे वाटते. कारण बहुतेकांनी येथे मनसोक्त वाचन केले, पदव्या संपादन केल्या, डॉक्टरेटस्‌
मिळविल्या. लहान मोठे लेखक आपण साहित्यिक येथील ज्ञानसाधनेने झालो असे सांगून आपले
संस्थेवरील प्रेम व्यक्त करतात. ह्यातच संस्थेने मोठे यश मिळविले. प्रतिदिनी 12 तासांची अखंड सेवा कुशलतापूर्वक सेवा देणार्‍या नम्र सेवकांचा या यशात वाटा आहे.
ग्रंथपालन वर्ग, मराठी लघुलेखन वर्ग उत्तमप्रकारे चालू आहेत. अशाप्रकारे बहुविध ज्ञान
प्रसारण सेवेत संग्रहालय अग्रणी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 40 रुपये मासिक वर्गणीत सर्व सेवा पुरविली जात आहे. कमी
वर्गणीमुळे जास्तीत जास्त सभासदांना वाचनाचा लाभ घ्यायला मिळावा हा हेतू आहे.